गंगापूर, (प्रतिनिधी) : छत्रपती संभाजीनगर – गंगापूर मार्गावर बाबरगाव फाटा येथे सोमवारी सकाळी १०:३० गंगापूरकडे येणाऱ्या एस.टी. बसने ओव्हरटेक करताना दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन जण जखमी झाले. जखमींना गंगापूर जिल्हा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आला आहे.
जखमींची नावे कडुबाळ बाबासाहेब पठाडे (वय २३) आणि सविता बाबासाहेब पठाडे (वय ४५, दोघे रा. बाबरगाव) अशी असून, त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच मोरया रुग्णवाहिका चालक सागर शेजवळ, कुष्णा चव्हाण आणि पवन बाफना यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने गंगापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
या घटनेमुळे गंगापूर एस. टी. डेपोच्या हलगर्जीपणावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. गंगापूर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.

















